बुलडाणा, दि. १६- जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्ह्यात १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन १६ मार्चला करण्यात आले. जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलरथाचे पूजन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग हेमंत सोळगे, जि.प सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडावार, कार्यकारी अभियंता जिगाव उपसा सिंचन विभाग एस. व्ही.हजारे, सिंचन मित्रमंडळ नांदुराचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणीवापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, पंचायत समिती सभापती तस्लीनाबी रसुलखा आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सामूहिक जलप्रतिज्ञा करण्यात आली. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. अधीक्षक अभियंता चौधरी यावेळी म्हणाले की, २२ मार्च या जागतिक जलजागृती जलदिनानिमित्त जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात १0 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करुन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांनी जलजागृती सप्ताहांतर्गत राबविल्या जाणार्या विविध कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, प्रकल्प लाभक्षेत्रातील प्रत्येक गावांत एक कार्यशाळा किंवा चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थांची संपूर्ण माहिती, होणारे फायदे, सिंचनाचे प्रश्न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, भूसंपादन, पूनर्वसन, उपसा सिंचन परवाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पूर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपूजन यावेळी करण्यात आले. सप्ताहादरम्यान १९ मार्च रोजी वाटर रन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृव्त स्पर्धा आदी अनुषंगिक स्पर्धांंंचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचलन करून आभार चंद्रकांत साळुंके यांनी मानले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
जलप्रतिज्ञा घेऊन जलजागृती सप्ताहाला सुरुवात
By admin | Published: March 17, 2017 2:23 AM