बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली असून एकाच दिवशी १,२८५ जण कोरोना बाधित निघाले आहे. एकूण बाधितांचा ही आकडा ५० हजाराच्या पार गेला आहे. त्यामुळे संक्रमणाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहर व तालुकास्तरावर मदत केंद्र उभारावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.
कोरोनाची दुसऱ्या लाटेत झपाट्याने संक्रमण होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढले असून अैाषधांसाठी अनेकांची धावपळ होत आहे. त्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहर व तालुका स्तरावर मदत केंद्र सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात या संकट काळातही सजगपणे शिवसेना काम करत आहे. अलीकडे रुग्णांची वाढ मोठ्या संख्येने झाली आहे. त्यातच ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची ही संख्या साडेपाच हजार झाली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता ही वाढत्या रुग्णसंख्येमुळे पडत आहे. काही ठिकाणी इंजेक्शनसाठी काळाबाजार ही होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना मदत करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात यावे, तसेच शासनाचे नियम विचारात घेऊन रक्तदान शिबिर ही आयोजित करण्याची गरज आहे. त्यास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन बुधवत यांनी केले आहे. सोबतच या मदत केंद्रामध्ये तालुका, शहर परिसरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या आणि बाधित रुग्णांची सुश्रृषा करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांचे अद्ययावत मोबाईल क्रमांकही प्रसिद्ध करण्यात यावे, असे बुधवत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.