डोणगाव : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने १५ एप्रिलपासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गंत कडक निर्बंध लावले आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, राष्टीय महामार्गावर असलेल्या डाेणगाव येथे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तही अन्य दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
महामार्गावर असलेल्या डाेणगाव येथून शेकडाे प्रवाशी ये-जा करतात़
डोणगाव हे राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे शेकडो वाहने ये-जा करत असतात. याचाच फायदा घेऊन अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेले दुकानदार आपले दुकान अर्धवट उघडून दुकानासमोर उभे राहतात. बसस्थानक परिसरात व संपूर्ण गावात संचारबंदीचा फज्जा उडताना दिसत आहे़. पोलीस येत असल्याचे बघून तात्पुरती दुकाने बंद होत असल्याने ‘ब्रेक द चेन’च्या नियमांचे उल्लंघन होत आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेमध्ये असणारी भाजीपाला दुकाने ही आठवडा बाजारात आहेत. परंतु, तेथे गर्दी होत असल्याचे कारण दाखवून ग्रामपंचायतीने भाजीपाला दुकाने सर्व बाजूने बांबू लावून बंद केल्याने व मंडपाच्या कापडाने झाकल्याने तेथे ग्राहक जाऊ शकत नाही़. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसमोर संकट उभे राहिले आहे तर दुसरीकडे सर्रास अर्धवट दुकाने उघडली जात असताना, संबंधित प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे़. प्रशासनाने बसस्थानक परिसरात गर्दी करणाऱ्या व अर्धवट दुकाने उघडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
भाजी मंडईमध्ये एकाच ठिकाणी भरपूर दुकाने एकाच जागी आहेत. भाजीपाला दुकानदारांनी भाजी मंडईमध्ये दुकान लावले आहे. त्यांना समजून सांगितल्यानंतरही त्यांनी दुकाने याठिकाणी लावलेली आहेत. त्यामुळे माेठ्या प्रमाणात गर्दी वाढत हाेती़. भाजी मंडई बंद आहे, भाजीपाला विक्री बंद नाही़.
ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामविकास अधिकारी, डोणगाव