देशभरात कोरोना लस देण्याचा तिसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊन ही लस देण्यात येत आहे. तसेच ही लस घेण्याचे आरोग्य विभागानेदेखील आवाहन केले आहे. मात्र ही लस घेण्यासाठी आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळाची माहिती अथवा पुरेसे ज्ञान उपलब्ध नाही.
यासह अनेकांजवळ स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक या कोरोना रोगप्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सर्वात मोठे ३० खाटांचे रुग्णालय म्हणून देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. असे असतानादेखील या भागातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे येथील रुग्णालयात लस उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठांची गैरसोय दूर होणार आहे. तरी आरोग्य विभागाने ऑफलाइन सेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.