लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परिसरात उपस्थित राहणार नाही. संबंधित विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पयर्ंतच्या कालावधीमध्ये पूर्ण वेळ उपस्थित रहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात कार्यवाही करावी लागणार आहे. पेपर सुरू असलेल्या विषयाचा किंवा कोणताही विषय शिक्षक परीक्षा केंद्राचे आवारात आढळला, तसेच तोंडी उत्तरे सांगणे, सांकेतिक भाषेचा उपयोग करून परीक्षार्थींना मदत करणे असा प्रकार दिसून आला. त्यांच्याविरुद्ध विद्यापीठ व परीक्षा गैरप्रकार अधिनियम १९८२ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.परीक्षा केंद्र परिसरात सायक्लोस्टाइल, झेरॉक्स, उत्तरे असलेले कागद दिसून आल्यास संबंधित केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले असून, परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, वीज वितरणने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित केल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.
आजपासून बारावीच्या परीक्षेस जिल्ह्यात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:45 AM