साखरखेर्डा हे गाव १८ हजार लोकसंख्येचे गाव असून, भारतीय स्टेट बँक ही एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेला मेहकर तालुक्यातील हिवरखेड, मोहखेड, लव्हाळा, पिंपळगाव काळे, चिखली तालुक्यातील आमखेड, रानअंत्री तर सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद, राताळी, मोहाडी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, दरेगाव, हनवतखेड, हिवरागडलिंग, आंबेवाडी, कंडारी, भंडारी, जागदरी, राजेगाव, लिंगा, सायाळा, वडगावमाळी, सावंगीमाळी, मोहदरी, सावंगीभगत, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, भगतसावंगी, गुंज, वरोडी, शेवगा जाहाँगीर, काटेपांग्री ही गावे सलग्न आहेत. साखरखेर्डा येथे स्व. भास्करराव शिंगणे कला, आशालता गावंडे वाणिज्य, नारायण गावंडे विज्ञान महाविद्यालय, एस. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात, जिजामाता विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, उर्दू हायस्कूल, अनिकेत सैनिक स्कूल, पाच प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन यासह अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा आर्थिक व्यवहार स्टेट बँकेला सलग्न आहेत. शिक्षक, सेवा निवृत्त कर्मचारी व इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन याच बँकेतून होते. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी येथेच यावे लागते. डी.डी. काढायचा असेल तर डीडीवर स्वाक्षरी घेण्यासाठी मलकापूर पांग्रा येथे जावे लागते. जानेवारी महिन्यापासून बँक खाते उघडण्यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज भरून दिले आहेत. आज एकाही ग्राहकाला नवीन खाते मिळाले नाही. पीक कर्जासाठी शेकडो फाइल साचून आहेत. केवायसी करण्यासाठी दररोज बँकेसमोर लाइन लागते, पण काम होत नाही. अशा कितीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत.
समस्या सोडवा नाही तर तालाठोको आंदोलन
शाखा व्यवस्थापक नाही, फिल्ड ऑफिसर नाही, केवायसी करण्यासाठी कर्मचारी नाही. असले संभाषण ऐकावे लागते. ग्राहकांना स्टेट बँकेशिवाय पर्याय नाही. हे माहीत असताना वरिष्ठ अधिकारी दखल घ्यायला तयार नाही. आठ दिवसात दखल घेतली नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने बँकेला तालाठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, शिवसेना नेते, माजी सरपंच रवींद्र पाटील, माजी समाजकल्याण सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास पाटील रिंढे, माजी पंं.स. सभापती राजू ठोके, महेंद्र पाटील, सरपंच दाऊत कुरेशी, सर्व परिसरातील सरपंच यांनी दिला आहे.
माझा नातू शाळेत शिकत आहे. त्याच्या नावे खाते उघडण्यासाठी मार्च महिन्यात अर्ज दाखल केला आहे. ते अद्याप उघडू शकले नाही.
- टी के खरात