बुलडाणा : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना समर्पित राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलनाचे आयोजन २३ जानेवारी रोजी बुलडाणा नगरीत करण्यात आले आहे. महानायक कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष राहणार आहेत, तर स्वागत अध्यक्ष म्हणून डाॅ. सुकेश झंवर राहणार आहे .
उद्घाटन सत्र, तीन परिसंवाद, समारोपीय सत्र व कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे.
स्थानिक गर्दे सभागृहात संमेलन पार पडणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशप्रेमी विचार समाजाच्या तळागाळात पोहोचविण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून आझाद हिंद संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक ॲड. सतीषचंद्र रोठे यांनी दिली.
याबाबत कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक १६ जानेवारी राेजी पार पडली. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणदेखील करण्यात आले. डॉ. सुकेश झंवर, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, शाहीनाताई पठाण, पत्रकार गणेश निकम, ॲड. जयसिंगराजे सुनील सपकाळ, शाहीनाताई पठाण, शाहीर डी. आर. इंगळे. शाहीर हरीदास खांडेभराड, गणेश तायडे, श्रीकृष्ण भगत, राम हिंगे, संजय एंडोले, ॲड. विजयकुमार कस्तुरे, सुभाष देशमुख, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी संमेलनाच्या आयोजनासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ संपादक लोकनायक प्रकाश पोहरे, शेतकरी नेते अविनाश काकडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यातील साहित्यिक, लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील साहित्यिकांचा सहभाग राहणार असल्याचे ॲड. रोठे यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यासह शहरातील सर्व सामाजिक, राजकीय व वैयक्तिक प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक नेताजी सागर साहित्य संमेलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.