- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळातील १५ विभाग नियंत्रकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये बुलडाण्याचे वादग्रस्त ठरलेले विभाग नियंत्रक अनिल म्हेत्तर यांचीही रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. लाच प्रकरण आणि बसचालकांशी झालेला वाद यामुळे ते चर्चेत आले होते. यापूर्वी ही त्यांची बदली झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडूनच विभागीय नियंत्रकांची बदली करण्यात आल्याने या बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप बुलडाण्याच्या विभागनियंत्रकांवर आहे. त्यामुळे ते चर्चेत आले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डिसेंबरमध्ये हे लाच प्रकरण समोर आणले होते. तेंव्हापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात कामाकाजात मरगळ आल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर गत पाच दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाºयांमध्ये हाणामारी झाल्याची घटना येथील विभाग नियंत्रक कार्यालयात घडली. लाच प्रकरण आणि वाद यामुळे बुलडाणा विभाग वादग्रस्त ठरले असतानाच राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी विभाग नियंत्रक अनिल म्हेत्तर यांची बदली राज्य परिवहन विभाग रत्नागिरी येथे केली आहे. बुलडाण्याच्या विभाग नियंत्रकांबरोबरच एकुण १५ विभाग नियंत्रकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन दिवस अगोदरच बदल्यांची लाट राज्य परिवहन महामंडळात आली आहे.
पश्चिम वºहाडातील तीन विभाग नियंत्रकांच्या बदल्या
पश्चिम वºहाडातील बुलडाणाबरोबरच अकोला व यवतमाळ येथील विभाग नियंत्रकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यवतमाळ येथील विभाग नियंत्रक अशोक वरठे यांची बदली नागपूर विभागात करण्यात आली आहे. तर अकोला विभागातील रोहन पलंगे यांची बदली राज्य परिवहन विभाग कोल्हापूर करण्यात आली आहे.