लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोणार सरोवर विकास व व्यस्थापनाच्या दिशेने पावले पडण्यास प्रारंभ झाला असून भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किस्ट्रक्चरच्या सहाय्यक प्राध्यापक विशाखा कव्हेटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी २३ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी लोणार सरोवर परिसरास भेट देऊन पाहणी केली होती.दरम्यान, सरोवरात १५ आणि काठावर पाच स्मारके असून त्यांचे जतन दुर्लक्षीत झालेले आहे. त्याची पाहणी यापूर्वी करण्यात आली होती. सोबतच महसूल, पुरातत्व, वनविभाग, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूजल सर्व्हेक्षणसह संबंधित विभागाकडून विकास आराखड्याच्या दृष्टीने माहिती संकलीत करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रामुख्याने आगामी दहा वर्षामध्ये या ठिकाणी करावयाच्या कामाच्या संदर्भाने भोपाळवरून आलेल्या या मंडळींनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.लोणार सरोवर विकासासंदर्भात धिम्या गतीने पडणारी पावले पाहता गेल्या वर्षी नागपूर खंडपीठाने यंत्रणेला फटकारले होते. त्यानंतर ‘लोणार सरोवर एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा’ बनविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याची जबाबदारी भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किस्ट्रकचरला सोपविण्यात आली होती. २३ नोव्हेंबरला भोपाळच्या या कॉलेजच्या प्राध्यापकांनी लोणारला पहिल्यांदा भेट दिली होती.लोणार सरोवराचे जतन व्हावे व तेथे विकास व्हावा, या दृष्टीकोणातून नागपूर खंडपीठात ऐक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सरोवर क्षती प्रतिबंधक तथा संवर्धन समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी या समितीच्या अध्यक्ष आहेत. खडंपीठच्या निर्देशानुसार ही समिती सध्या कार्यरत असून खंडपीठाने दिलेल्या सुचनेनुसार लोणार सरोवर व परिसराचा सर्वंकष असा एकात्मिक विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. या समितीने बोलावल्यानुसार दुसऱ्यांदा भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किस्ट्रकचरच्या विशाखा कव्हटेकर आणि रमेश भोळे लोणारात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येवून गेले.त्यानुषंगाने कच्चा आराखडा तयार करण्यास प्रत्यक्ष प्रारंभ होण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. के. सुक्रे आणि माधव जमादार यांनी लोणार सरोवर येथे प्रत्यक्ष येऊन आतापर्यंत झालेल्या कामांची पाहणी केली होती. त्यामुळे प्रशासकी पातळीवरही यासंदर्भात आता हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे आराखडा लवकरच तयार होईल, अशी अपेक्षा आहे.
सरोवर विकास व व्यवस्थापनाच्या दिशने पडतेय पाऊल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:34 PM