बुलढाणा - माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप नेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील संभाजी चौकात दुपारी ३.३० वाजता तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. भाजप नेते शरद अग्रवाल यांचा रविवारी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देणारे जाहिरातीचे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवर गावातील नामांकित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यावर एकच भाऊ, दादा, अन्ना, एकच समाजरत्न असे शब्दप्रयोग करण्यात आले आहेत.
शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना या नावाने संबोधल्या जात असल्याने शहरातील काही लोकांच्या ही जाहिरात जिव्हारी लागली. त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घरासमोर मुर्दाबादच्या घोषणा देणे सुरु केले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीचार्ज सुरु केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येवू शकली, अशी माहिती ठाणेदार डी.डी. ढाकणे यांनी लोकमतला दिली. आ.कुटेंची भेट घटनास्थळी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी भेट देत नागरिकांना शांत केले. शेगाव शहरातील गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.