लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेत. राज्य शासनाकडून गर्दी टाळण्यासाठी सूचना केल्या जाताहेत. मात्र, खामगावातील वरली अड्डयांवर मात्र मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. पोलिसांचा या वरली अड्डयांवर कोणताही अकुंश नसल्याचे चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये गुरूवारी उघडकीस आले.गुरूवारी आठवडी बाजार बंद असताना, आठवडी बाजारातील एका वरली अड्डयावर सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली.खामगाव शहरातील वरली अड्ड्यांना पोलिसांचे अभय असल्यामुळे गत काही दिवसांपासून खामगावातील अवैध धंदे वाढीस लागले आहेत. आठवडी बाजारातील वरली अड्ड्यावर गुरूवारी बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी होते.
रस्त्यावर घेतले जातात आकडे!आठवडी बाजारातील रस्त्यावर चक्क वरलीचे आकडे घेतल्या जातात. अतिशय राजरोसपणे हा व्यवसाय सुरू आहे. मात्र, पोलिसांना हे अवैध धंदे दिसत नसल्याने, शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवसा आणि रात्रीही गर्दीवरलीचे आकडे लावण्यासाठी आठवडी बाजारासह शहरातील इतरही वरली आणि जुगाराच्या अड्डयांवर ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होते. शहरातील अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळेच शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करताना पोलिसांची कोंडी होत असल्याची चर्चा आहे.
असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!शहरातील आठवडी बाजारात वरली अड्डा सुरू असल्याची सुरूवातीला खात्री करण्यात आली. त्यानंतर बुधवारी रात्री ८ वाजता आणि गुरूवारी सकाळी १० वाजता, दुपारी २:३० वाजता या वरली अड्ड्याला ‘लोकमत’प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी बाजार बंद असतानाही वरली अड्ड्यावर मोठी गर्दी दिसून आली. आठवडी बाजारातील रस्त्यावर चक्क वरलीचे आकडे घेतले जात होते.