मुंबई : शेअर बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने बाजार उसळला आहे. सेन्सेक्समध्ये १३३५ अंश, तर निफ्टी ३८३ अंशांनी वाढून बंद झाला. यामुळे हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ६० आणि १८ हजारांचा टप्पा पार करून गेले आहेत. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणाच्या बातमीने बाजारात उत्साह संचारला. यामुळे बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांमध्ये मोठी तेजी असलेली दिसून आली. त्याचप्रमाणे एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान आणि धातू कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे ५०० अंशांनी वाढून खुला झाला. त्यानंतर तो ६०,८४५.१० अंशांपर्यंत वाढला. बाजार बंद होताना तो ६०,६११.७४ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १३३५.०५ अंश म्हणजेच २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारातही दिवसभर तेजीचे वातावरण राहिले. गुंतवणूकदार मोठ्या संख्येने खरेदीसाठी असल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले होते. दिवसअखेर येथील निर्देशांक (निफ्टी) ३८२.९५ अंशांनी म्हणजेच २.१७ टक्क्यांनी वाढून १८,०५३.४० अंशांवर बंद झाला. एचडीएफसीच्या विलीनीकरणाच्या बातमीने एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे या दोन्ही समभागांचे दर सुमारे १० टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्समधील केवळ टायटन आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांच्या दरामध्ये घट झाली आहे. अन्य सर्व कंपन्या तेजीमध्ये असलेल्या दिसून आल्या.
गुंतवणूकदार झाले मालामालशेअर बाजारात सोमवारी झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे ४.५ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे या कंपन्यांमधील गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत. शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवलमूल्य २,७२,४६,२१३.६२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील मूल्यापेक्षा ते ४.५ लाखांनी वाढले आहे.