चिखली, दि. ४- येथील औद्योगिक वसाहतीमधील बाजार समितीच्या यार्डातील नाफेडची तूर खरेदी बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून पूर्णत: बंद केली असल्याने शेतकर्यांची गैरसोय पाहता खरेदी केंद्रावर आवश्यक बारदाना उपलब्ध करून देत तातडीने खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी ४ मार्च रोजी दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. मेहकर फाटा येथे शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संयुक्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच याच मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीनेदेखील रास्ता रोको आंदोलन छेडल्याने चिखली-देऊळगाव राजा व मेहकर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.येथील नाफेड केंद्राला मुबलक बारदाना देऊन खरेदी पूर्ववत सुरू करावी. खरेदी झालेल्या तुरीचे पैसे शेतकर्यांना तत्काळ देण्यात यावे, नाफेडच्या यार्डातील तूर खरेदी करून प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांचीही तूर खरेदी करावी. खरेदी नियमाप्रमाणे सकाळी १0 वाजता करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना एकत्रित येऊन मेहकर फाट्यावर दुपारी बारा वाजता रास्ता रोको केले.या आंदोलनामुळे सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी सायंकाळपर्यंत बारदाना उपलब्ध करून देण्याची हमी दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.
नाफेडची खरेदी पूर्ववत होण्यासाठी काँग्रेसचा रास्ता रोको!
By admin | Published: March 05, 2017 2:00 AM