देऊळगावमही : आघाडी सरकारने अर्थ संकल्पीय अधिवेशनात थकीत वीजबिलधरकांची वीज खंडित न करण्याची घोषणा केली होती. मात्र अचानक यू-टर्न घेत वीज खंडित न करण्याचा निर्णय मागे घेत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून, अनेक शेतकऱ्यांची उभे पिके वाळत आहे. महावितरणने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
देउळगाव राजा तालुक्यात सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग, मका, ऊस, पपई, टरबूज, अद्रक, भाजीपाला आशा पिकांची लागवड केली आहे. दिवसेंदिवस ऊन तापत असून, दर तिसऱ्या दिवशी या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.मात्र वीजबिल थकबाकीच्या नावाखाली महावितरणाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित करण्यास सुरुवात केली आहे. अंदाजित अव्वाच्या-सव्वा रकमा बिलावर टाकून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.अर्थ संकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी थकीत वीजबिलधारकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची घोषणा केली. मात्र, दोन दिवसांतच वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतातील पिके सुकत आहेत. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे तात्काळ थांबवा, अन्यथा महावितरणाच्या या तुघलकी कारभारा विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसंग्राम संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत पठाण, विनायक अनपट, संतोष हिवाळे, चंद्रभान झिने आदींनी दिला आहे.