- अनिल गवई
खामगाव: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाने आता ‘शिवशाही’ला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ‘शिवशाही’ चलती करण्यासाठी प्रवाशांच्या आवडत्या ‘लाल’परीला विविध आगारातून तात्पुरता ‘विराम’ मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसे अलिखीत आदेशच वरिष्ठ स्तरावरून संबधीत आगारांना देण्यात आल्याची चर्चा आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी विविध बदल घडवून ‘शिवशाही’ ही वातानुकुलीत व आरामदायी बस सेवा सुरू केली . बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, चिखली, आणि मेहकर या सात आगारांना विभागून १६ बसेस देण्यात आल्या आहेत. यामध्ये शेगाव येथील आगारातून ४ डिसेंबर २०१७ रोजी शेगाव- पुणे आणि शेगाव- अकोला या मार्गावर तर ५ डिसेंबर २०१७ रोजी बुलडाणा आगारातून बुलडाणा-पुणे या मार्गावर शिवशाही बससेवा प्रारंभ झाली होती. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि उर्वरीत आगारातून तसेच पश्चिम विदर्भातील इतरही आगारात ‘शिवशाही’ सुरू झाली. मात्र, अतिरिक्त भाड्यामुळे या ‘शिवशाही’ ला मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद पाहता, एसटी महामंडळाने ‘शिवशाही’ला प्रोत्साहन देण्याचे ठरविले. त्यामुळे ‘शिवशाही’ असलेल्या मार्गावरील ‘लाल’परी ‘ब्रेक’ केल्या जात आहे. खामगाव आगारासह पश्चिम विदर्भातील सर्वच आगारात कमी अधिक फरकाने हा प्रकार सुरू असल्याने महामंडळाला लालपरी ‘सावत्र’ झाली की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाड्यामुळे ‘शिवशाही’कडे पाठ!
वायफाय, सीसीटीव्ही, स्लीपर कोच सुविधायुक्त आणि वातानुकीत शिवशाही बसचे भाडे साधारणबसपेक्षा अधिक आहे. साधारण बसच्या तुलनेत दीडपट भाड्यामुळे सामान्य प्रवाशांना हे भाडे परवडणारे नाही. परिणामी सामान्य प्रवाशांची शिवशाहीकडे पाठ असल्याचे दिसून येते. शेगाव-पुणे करीता ७३२ रुपये, तर खामगाव- अकोला करीता ८६ रुपये, अकोला- अमरावतीसाठी १४७ रुपये भाडे आकारल्यात येत आहे. सामान्य बसच्या तुलनेत हे भाडे अधिक आहे.
प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी शिवशाही ही वातानुकुलीत बससेवा सुविधा करण्यात आली आहे. शिवशाहीला प्राधान्यक्रम दिल्या जाण्याचे कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. इतर गाड्याप्रमाणेच या गाड्यांचेच शेड्युल्ड शिवशाहीचे आहे.
- आर.आर. फुलउंबरकर, आगार, व्यवस्थापक, खामगाव.