लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : फार्मासिस्ट नसताना काही औषध दुकानांमध्ये औषधांची विक्री होत असल्याची माहिती औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे आळसणा येथे शनिवारी एका औषध दुकानाची दक्षता पथकाने तपासणी केली, दरम्यान, हे दुकान फार्मासिस्टविना चालवल्या जात असल्याचे आढळल्यावरून औषध विक्री रोखण्याचा आदेश दिला. फार्मासिस्ट ठेवणे कायद्याने बंधनकारक केल्यानंतरही दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत सर्रास औषध विक्री होत असल्याचे काही महिन्यांपासून आढळून येत आहे. औषधांच्या दुकानातून फार्मासिस्टच्या हातूनच औषधांची विक्री होणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी फार्मासिस्टचे नोंदणी प्रमाणपत्र घेऊन औषधांची विक्री सुरू आहे. औषधांचे ज्ञान नसलेल्यांनी फार्मासिस्टशिवाय औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले. यामुळे फार्मासिस्टशिवाय औषध विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार शेगाव तालुक्यातील आळसणा येथील माउली मेडिकल येथे अवैधरीत्या औषधींची विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी औषध प्रशासनाला प्राप्त झाल्यावरून शनिवारी दक्षता विभागाने आळसणा येथे पोहचून पंचांसमक्ष पंटर पाठवून सर्दी आणि तापीच्या गोळ्याची मागणी माउली मेडिकलवर केली. दुकानावर हजर असलेल्या इसमाने लगेच हे औषधी दिल्याने पंटरने इशारा देताच दक्षता विभागाच्या पथकाने धाड टाकून रंगेहात पकडले. यामध्ये औषध दुकानाची तपासणी केली असता, अनेक गैरप्रकार आढळून आल्याचे समजते. यामध्ये एच- १ या औषधीच्या साठ्याचीही नोंद नसणे, ग्राहकांना बिले न देणे, हजर स्टाक बाबत कागदपत्रे उपलब्ध नसणे, याशिवाय काही संशयास्पद औषधी साठा ठेवणे आदी गंभीर बाबी आढळल्या आहेत. आळसणा येथील औषधी दुकानाच्या तपासणीत फार्मासिस्ट नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत वरिष्ठांकडे औषध दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे.- पी.बी.अस्वार,दक्षता विभाग प्रमुख, औषधी विभाग अमरावती
शेगावातील औषध दुकानातील विक्री रोखली!
By admin | Published: July 03, 2017 12:59 AM