संग्रामपूर-वरवट बकाल : शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण वरवट बकाल येथील चौफुलीवरील रस्ते महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधवांनी रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, तामगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचे आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन सुरू होते. मात्र, १ सप्टेंबर रोजी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याने असंख्य मराठा समाज बांधव भगिनी गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. संग्रामपूर तालुक्यातसुद्धा घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. रविवारी मराठा समाज बांधव व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वरवट बकाल येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह संग्रामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव सहभागी झाले.
- भाजी बाजार हर्रासीही थांबली
वरवट बकाल : तालुक्यातील वरवट बकाल या ठिकाणी पहाटेपासून कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संपूर्ण मार्केट बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यांनी राज्य सरकार विरुद्ध नारे देत घोषणाबाजी केली. पहाटे या ठिकाणी भाजीबाजार हर्रासीदेखील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे बंद करून आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच जीवनावश्यक औषधी, पेट्रोल पंप, दवाखाने वगळता इतर प्रतिष्ठाने बंद होती. तामगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दोन तास रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तामगाव ठाण्यात स्थानबद्ध केले. यावेळी काॅंग्रेस, उबाठा शिवसेना, राष्टवादी काॅंग्रेस यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले.