देऊळगाव राज ः कोरोना पॉझिटिव असल्याची माहिती असूनही किराणा दुकान सुरू ठेवून कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील एका व्यापाऱ्याविरुद्ध पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून १४ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अहिंसा मार्ग स्थित एका दुकानदाराची रॅपिड टेस्ट ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधीक्षकांनी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती होण्याचे निर्देश दिले असता आम्ही जालना येथे खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगितले. त्यांच्या मुलासह किराणा दुकानातील तिघांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आले असता त्यांचा मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व तो रविवारी दुकान उघडून ग्राहकांना किराणा माल देत असल्याची माहिती कोरोना संसर्ग विरोधी पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. याबाबत पालिका मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यातर्फे राजेश बन्सीलाल अग्रवाल पालिका लिपिक यांच्या फिर्यादीवरून दुकानदाराच्या मुलाविरुद्ध कोरोना पॉझिटिव्ह असताना सूचना देऊनही सामाजिक अंतर न ठेवता तसेच मास्क न लावून कोरोना संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात नाईक पोलीस कॉन्स्टेबल गजानन भराड तपास करत आहे.