विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव - मलकापूर: खामगाव, मलकापूर, शेगाव तालुक्यात वादळी वार्याचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून पडली असून, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात झाडांची फांदी डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
रविवारी सायंकाळी मलकापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्याच वेळी बेलाड येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. स्थानिक रहीवाशी निवृत्ती घंसाराम इंगळे (वय ६४) राहत्या घरी पाऊस आल्यावर सामानाची आवराआवर करीत होते. त्याचवेळी जोमाने वारा सुटला व घरालगतच्या झाडाची फांदी निवृत्ती घंसाराम इंगळे यांच्या डोक्यावर पडली. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले.
मात्र डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर करीत आहेत. मलकापूर शहरातील भीमनगरात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पुरातन शिवमंदिराचा खांब कोसळला. त्यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात मलकापूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.