धामणगाव धाड : येत्या आठ ते दहा दिवसात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत असून, खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच कडक निर्बंध लावण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शेतात नांगरणी करण्याचे व खत टाकण्याचे काम शेतकरी करत आहेत. २४ मेपासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात पाऊस आल्यास शेतकरी मशागतीला सुरुवात करतात. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, रासायनिक खते घेण्याची लगबग सुरू होते. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध असल्याने बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्याला घरी असलेला शेतमाल विकल्याशिवाय पर्याय नाही. जिल्हाबंदीमुळे शेतमालाला भाव नाही. अशातच खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव कशी करावी, ही चिंता पडली आहे. मोटार पंपाची कामे करावी तर दुकान बंद, कृषी केंद्रे बंद. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने लावलेले कडक निर्बंध पुन्हा वाढवले, तर शेतकरी खरीप हंगामाला सामोरा कसा जाणार? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. महागडे बियाणे व खते घेणे बाकी आहे. रोहिणी बरसल्या की शेतात पेरणीला सुरुवात होते आणि अशात कडक निर्बंध पाहता, खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.