खामगाव : नगर पालिका प्रशासनातंर्गत कचरा उचल करणाऱ््या घंटागाडी कामगारांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी घंटागाडी कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन छेडले. विविध समस्यांबाबत नवनियुक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्याशी चर्चा केली.
खामगाव शहरातील विविध प्रभागातील कचरा उचलण्याचा कंत्राट अमरावती येथील एका संस्थेला देण्यात आला. या कंत्राटदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिल्या जात नाही. तसेच किमान दरानुसार पगार देण्यात येत नाही. इपीएफआे कायद्यानुसार वेतन नाही. ईएसआयसी कार्ड देण्यात आले नाही. कामगारांचा विमा काढलेला नाही तसेच इतर सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उपेक्षित सामाजिक परिषदेतंर्गत कामगारांनी मंगळवारी आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या विविध प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन शेळके यांनी दिले. यावेळी के.एम. सारसर, संजय सरकटे, इंगळे यांच्यासह घंटागाडी कामगार उपस्थित होते.
वेतनासह विविध समस्यांबाबत आंदोलनाचा इशाराघंटागाडी कामगारांच्या मुलभूत समस्यांकडे कंत्राटदारासोबतच नगर पालिका प्रशासनाचेही सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कंत्राटदाराकडून सुरक्षा साहित्याबाबतही अडवणूक होत असल्याची ओरडही यावेळी घंटागाडी कामगारांकडून करण्यात आली.