लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ग्रामपंचायतीचे कामकाज पुर्णपणे खोळंबले असून ग्रामविकास थांबला आहे. याची दखल घेत ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामसेवकांना सक्त ताकिद देत कामावर रूजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान हा आदेश अन्यायकारक असून शासनाच्या आदेशासह जिल्हा परिषदेने काढलेल्या आदेशाची होळी करण्यात येणार असल्याचे राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी सांगितले. ग्रामसेवकांनी विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारत ग्रामपंचायतीच्या चाब्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिल्या आहे. सातव्या आयोगात वेतनश्रेणी तील त्रुटींची पूर्तता व्हावी, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नवीन भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता पदवीधर अशी करावी अशा मागण्यांचे निवेदन देत आंदोलन सुरु केले. मात्र महिना होत आला तरी अद्याप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना कोणताही तोडगा निघाला नाही.यामुळे महिनाभरापासून गावगाडा ठप्प झाला आहे. ग्रामसेवक संघटना सुद्धा आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घ्यायला तयार नसल्याने ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी एका आदेशान्वये ग्रामसेवकांना ड्युटीवर हजर होण्याबाबत आदेश दिले आहेत. जे ग्रामसेवक डयुटीवर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.उपसचिवांच््या आदेशानंतर जिल्हा परिषद पंचायत विभागाने ग्रामसेवकांना ताकिद दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले असून ग्रामसेवक संघटना तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवकांचे प्रलंबीत मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलन सुरू होते. आता ग्रामसेवक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडे प्रभार!ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामिण भागातील कामकाज प्रभावित झाले आहे. अकोला, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडे प्रभार दिला आहे. एवढेच नाहीतर यादरम्यान ग्रामपंचायतच्या कामाची तपासणी करून अनियमितता आढळल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आल्याने ग्रामसेवकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.ग्रामसेवक संघटना आक्रमकग्रामविकास विभागाच्या सचिवाच्या आदेशानंतर बुलडाणा जिल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा जिल्हयातील ग्रामसेवकांना तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
बुलडाणा, अकोला, अहमदनगर जिल्हयासह अनेक ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सक्तीचे आदेश देत ग्रामसेवकांवर दबाव टाकला आहे. पण न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सोमवारी सर्व पंचायत समितीच्या ठिकाणी सचिवांच्या आदेशासह गटविकास अधिकाºयांच्याही आदेशाची आम्ही होळी करणार आहोत.- प्रशांत जामोदे,राज्य सरचिटणीस, राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र.
ग्रामविकास विभागाचे उपसचिवांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. मात्र हा विषय शासनस्तरावरील असल्याने संप कधी मिटेल याबाबत सांगू शकत नाही.- संजय चोपडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा