लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यात मागील महिन्यात सरासरी २०९ मिमी पाऊस पडूनही जलपातळीत वाढ झाली नाही. धो-धो पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी झपाट्याने पेरण्या केल्या. शेतात हिरवे अंकुरही फुलले; परंतु गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक जगविणे कठीण झाले आहे. यातही काही शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. तर कोरडवाहू शेतीतील पिकाने माना टाकायला सुरुवात केली आहे.तालुक्यात ६५ हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रफळ असून, सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. २ जूनपासून पाऊस पडत राहिला. यातच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोयाबीन खापल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; पण पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. कपाशी पिकाची लागवड जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी केली आहे. कपाशीची रोपटे शेतात डोलू लागली. तिही सध्या पाण्यावाचून कोमजू लागली आहे. वातावरण ढगाळ आहे, तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. पेरलेले उगवले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा वापर करणे सुरू केले असून, विजेच्या भारनियमनाने तेथेही शेतकऱ्यांचे हात टेकले आहे. एकूण खरीप पिकांची परिस्थिती गंभीर असून, निसर्गच शेतकऱ्यांना वाचवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. कपाशीची रोपटे जगविणे कठीण असून, दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा काढावा.- समाधान वाघ, कृषी सहायक.
शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी धडपड
By admin | Published: July 03, 2017 12:46 AM