- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून जोहरनगर मधील नागरिक व प्रशासनामध्ये संघर्षाची ठिणगी पडली असून आतापर्यंत तीनदा शहरातील जुन्या स्मशानभूमीत कोवीड मृतकांचे अंत्यसंस्कार रोखण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, प्रसंगी स्मशानभूमीमधील एक डोम कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.दुसरीकडे तहसिलदार संतोष शिंदे आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनीही कोवीड मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी बुलडाणा शहर परिसरात मोकळी जागा शोधण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा कारागृहामागील ई-क्लास जमीनीसह शहरालगतच्या अन्य काही जागांची पाहणी सध्या करण्यात येत असल्याचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. यासंदर्भात मातृभूमी फाऊंडेशनने एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास दिले होते. जुन्या स्मशानभूमितील एक डोम हा कोवीडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्याच्याही हालचाली आहेत.
शहरात कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारास विरोध नाहीयासंदर्भात बोलताना नगराध्यक्षपती मोहम्मद सज्जाद म्हणाले की, बुलडाणा शहरात कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांचे जोहरनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आमचा विरोध नाही. मात्र बाहेरगावच्या मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कार येथे करण्यास आमचा विरोध आहे. संगम तलावाजवळील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार होवू शकतात. मंगळवारी रात्री करवंड येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यास विरोध झाला होता.