डोणगाव : आपल्याला कॅन्सर आहे हे माहीत असूनही तीन वर्षांपासून आपल्या मुलाला कोण जगविणार, या जिद्दीपायी एक ३८ वर्षीय महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोलमजुरी करून जीवन जगत आहे. याकडे मात्र कुणीही लक्ष देत नसून व कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने आपल्या सहा मुलांना जगविण्याचे आव्हान या महिलेपुढे आहे. डोणगाव येथील शहेनाजबी शेख रफिक हिचा विवाह झाल्यानंतर तिला सहा अपत्ये झाली. ४ मुली, २ मुले, यापैकी शेख राजा शेख रफिक हा मुलगा दोन्ही डोळ्याने अंध तर दोन मुलीही एका डोळ्याने अंध आहेत. अशा परिस्थितीत घरदार नसताना पती हमाली करून तर महिला इतरांच्या शेतात मोलमजुरी करून आपला संसार जिद्दीने चालवित होते. त्यानंतर शहेनाजबी यांना २0१३ मध्ये तपासणीच्या दरम्यान कॅन्सर असल्याचे समजले. त्यावर त्यांनी औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात औषधोपचार घे तले. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असताना शासनाकडून सदर महिलेला कोणतीही मदत होत नसून, स्वत:चे घर नाही. एका नातेवाइकाच्या घरात राहत असून, त्या घरात अद्यापर्यंंत वीजही नाही. एवढेच नव्हेतर रेशनकार्ड असूनही कोणतेही धान्य मिळत नाही. अशाही कठीण परिस्थितीत सदर महिला ही आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी स्वत: कॅन्सरग्रस्त असूनही लोकांच्या शेतात मोलमजुरी करुन जिद्दीने जीवन जगत असली तरी तिला होणार्या वेदना दूर करण्यासाठी तिला सामाजिक संस् था, लोकप्रतिनिधी यांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कॅन्सरग्रस्त महिलेची घर चालविण्यासाठी धडपड!
By admin | Published: February 15, 2016 2:27 AM