मोताळा : तालुक्यातील तरोडा परिसरातील बोरखेड भागात असलेल्या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज ५ सप्टेंबर रोजी दुपार दरम्यान बोरखेड शिवारातील नदीमध्ये घडली. तरोडा येथील रेशन दुकानदार तारसिंग डांगे यांचा एकुलता एक मुलगा आश्विन डांगे वय १८ हा विद्यार्थी ५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेदरम्यान बोरखेड शिवारातील नदीमध्ये रेती भरण्यासाठी गेलेल्या स्वत:च्या ट्रॅक्टरजवळ गेला असता. नदीच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही. याबाबत आश्विनने ट्रॅक्टरवर काम करीत असलेल्या मजुरांना कल्पना दिली; मात्र तासभर उलटूनही आश्विन परत न आल्याने त्याची शोधाशोध सुरू केली असता नदीच्या काठावर त्याचे कपडे दिसले; मात्र आश्विन दिसला नसल्याने मजुरांनी पाण्यात उडी मारून शोध घेतला असता, आश्विनचा मृतदेह खोल पाण्यात फसलेला आढळला. आश्विन हा बुलडाणा येथील राजीव गांधी मिलीटरी स्कू लमध्ये अकरावी पास झाला होता. पुढील शिक्षणासाठी आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी आई-वडिलांनी त्याला नाशिकला पाठविले होते. गणपती उत्सवानिमित्त आश्विन तरोडा येथे आला होता. उदय़ा तो नाशिकला निघणार होता; परंतु आईच्या आग्रहाखातर एक दिवस घरी थांबला होता; मात्र नियतीने येथेच घात केला. चांगल्याप्रकारे पोहता येत असल्यावरही पाण्यात उडी मारल्याबरोबर झाडाच्या मुळांमध्ये पाय फसल्यामुळे आश्विन वर आलाच नाही. या घटनेमुळे संपूर्ण तरोडा गावावर शोककळा पसरली आहे.
नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: September 06, 2014 1:15 AM