लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वृक्ष लागवडीची आवड निर्माण होऊन वृक्ष संवर्धनाची संकल्पना बालवयात निर्माण व्हावी, या उद्देशाने नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायत काटीने वृक्षमित्र पुरस्कार योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत मराठी प्राथमिक शाळेत २०० विद्यार्थ्यांना विविध जातीचे रोपे देऊन १८ जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. सदर योजनेंतर्गत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास १५ आॅगस्ट २०१८ रोजी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नांदुरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काटी येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची आवड बालवयातच निर्माण व्हावी व वृक्ष संवर्धनाची संस्कृतीची संकल्पना बालवयात रुजावी, या हेतूने ग्रामविकास अधिकारी प्रशांत जामोदे, सरपंच विठ्ठल पाटील व सर्व ग्रा.पं. सदस्य यांनी अभिनव योजना राबविली. यासाठी ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून ‘विद्यार्थी वृक्ष मित्र पुरस्कार’ योजना आयोजित केली. त्यानुसार मराठी प्राथमिक शाळा काटी येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या २०० विद्यार्थ्यांना ग्रा.पं.च्यावतीने विविध प्रजातींची रोपे मोफत उपलब्ध करून दिली. ‘एक विद्यार्थी-एक रोपटे’ यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे मोफत ग्रा.पं. सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मराठी प्रा. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.जिवंत झाडाची पाहणी केल्यानंतर पुरस्कारविद्यार्थी कृषी मित्र पुरस्कार योजनेंतर्गत सदर रोपटे विद्यार्थ्याने आपल्या अंगणात, शेतात, घराच्या परिसरात लागवड करून त्याचे संवर्धन करावयाचे आहे. पुढील एक वर्षानंतर सदर जिवंत झाडाची पाहणी करून ज्या विद्यार्थ्यांनी झाड जगविले, त्याचा १५ आॅगस्ट २०१८ या दिवशी ग्रामपंचायतच्यावतीने ‘विद्यार्थी कृषी मित्र पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारात सन्मानपत्र व विशेष पारितोषिक देण्याचा मानस सचिव प्रशांत जामोदे व सरपंच विठ्ठल पाटील यांनी केला आहे.
वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थी कृषी मित्र पुरस्कार योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:55 AM