सिद्धार्थ आराख / बुलडाणा : इयत्ता अकरावी ते पदव्युत्तरपयर्ंत शिक्षण घेणार्या विविध प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार्या भारत सरकारच्या मॅट्रिकेतर शिष्यवृत्ती योजनेची ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारावर असून, त्यांना पुन्हा मुदत न मिळाल्यास या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात विविध लहान-मोठय़ा ३३९ शाळा,महाविद्यालयातील आतापर्यंत सुमारे ४५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले. अद्यापही ३0 टक्के म्हणजे सुमारे १३ हजार विद्यार्थी अर्ज दाखल करण्यापासून वंचित आहेत. चालु शैक्षणिक वर्षात ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आतापर्यंत तब्बल चार वेळा मुदत वाढवूनही ऑनलाइन प्रणालीमध्ये वारंवार अडचणी येत असल्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज भरणे विद्यार्थी व महाविद्यालयांना शक्य झाले नाही. परिणामी, यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीपासून १३ हजार विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. सन २0१0-११ या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागत आहेत. मागील शैक्षणिक वर्षातसुद्धा विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यंदाच्या २0१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरावयाचे होते, तर पुढील वर्षासाठीचे अर्ज महाविद्यालयांनी अपडेट करावयाचे होते. यासाठी यावर्षी तब्बल चार वेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांंना मुदतीत सर्व अर्ज भरता आलेले नाहीत.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात!
By admin | Published: January 28, 2016 11:28 PM