हिवरा आश्रम : विवेकानंदनगर येथील जिल्हा परिषद शाळेत झालेले बदल पालकांसह विद्यार्थ्यांनाही आकर्षित करणारे आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासोबतच गॄहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. काॅन्व्हेंटमधून अनेक विद्यार्थी या शाळेत आले आहेत.
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत मे २०१८ मध्ये सर्व नवीन शिक्षक रुजू झाले. सर्वप्रथम त्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. शाळा परिसरात बाग तयार केली; परंतु शाळेच्या परिसरात लग्नसमारंभ होत होते. मुले खेळायला येत असल्यामुळे बागेचे नुकसान होत होते. बाग सुरक्षित राहावी, म्हणून बागेला तारांच्या जाळीचे कुंपण करण्यात आले. शालेय परिसरात पावसाळ्यात खूप चिखल होतो. त्याकरिता गावात फिरून ज्यांच्याकडे रेती, रोढा पडलेला होता. त्यांच्याकडून रोढा आणून शाळेच्या प्रांगणात टाकला. त्यामुळे चिखल कमी झाला. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. परिणामकारक अध्ययन-अध्यापनासाठी भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य विषयानुरूप तयार केले.
कोरोनाकाळात शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक वर्गाचे व्हाॅट्स ॲप ग्रुप तयार करून त्यावर नियमितपणे अभ्यास देणे चालू आहे. गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. ‘प्रत्येक शनिवारी मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका’ हा कार्यक्रम चालू आहे. सर्व विद्यार्थी प्रगत झाले आहेत. नियमित पालक सभा घेण्यात येतात. शाळा स्थापनेपासून ४० वर्षांनंतर प्रथमच शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेच्या नावाचा बोर्ड लागला. काही दानशूर गावकरी मंडळींनी शाळेला आर्थिक मदत केली. त्यांतील दोन हजार रुपयांपेक्षा जास्त देणगीदारांची नावे शाळेच्या प्रवेशद्वारावर लिहिली गेली. शाळेचा हा प्रवास इतर शाळांसाठी आदर्श ठरतो.
आयएसओ मानांकन
आयएसओकरिता लागणारे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे ४ एप्रिल २०१९ रोजी शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, विवेकानंदनगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. महेश रोकडे, उपाध्यक्ष संतोष शेरे, प्रमुख मार्गदर्शक अरुण जाधव, मुख्याध्यापक अरविंद होणे, स. अ. प्रकाश दुनगू, दत्तात्रय दशरथे, संदीप पुरी, संजय पवार, सरिता तुपकर, मीनाक्षी म्हस्के व आशा साखरे यांनी परिश्रम घेतले.