लोणार : गत काही वर्षात जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळेमधील विद्यार्थिसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र याला शहरातील नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा, नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा आता अपवाद ठरत आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झालेले आहेत. मात्र अन्य वर्ग सुरू झालेले नाही; मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यावरून ही बाब स्पष्ट होत आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा पालिकेच्या शाळेकडे कल वाढला आहे. दर्जेदार व इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना नगर परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पसंती देत आहेत. शहरांमध्ये विविध संस्थांमार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात फी आकारल्या जात असल्यामुळे शेतमजूर पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी नगर परिषद प्राथमिक शाळेकडे वळले आहेत. कोराेना महामारीच्या काळात अनेकांवर आर्थिक संकट आले. लॉकडाऊनमध्ये अनेक लोक मोठ्या शहरातून गावाकडे परत आले. त्यांनी आपल्या मुलांचे प्रवेश नगरपालिकेच्या शाळेत घेतले आहेत. लोणार शहरांमध्ये नगर परिषदेच्या सहा शाळा आहेत. त्यामधून उर्दू माध्यमिक शाळा ह्या तीन असून, मराठी माध्यमाच्या तीन आहे. या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्याही मागील वर्षाच्या तुलनेमध्ये वाढली आहे. २०१९ या वर्षामध्ये ९२७ विद्यार्थी शिक्षण घेत होते. दरम्यान, २०२० मध्ये ९५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. माजी नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी मागील तीन वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नामुळे नगर परिषद शाळा डिजिटल झाल्या असून, शहरातील कॉन्व्हेंटमधील अनेक विद्यार्थी यावर्षी नगरपालिका शाळेत परतले आहेत.
पालिकेच्या शाळा झाल्या डिजिटल
खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षण व सुविधा दर्जेदार नसल्याची बहुतांश पालकवर्गाची मानसिकता आहे. परिणामी शहरी भागातील खासगी शाळा किंवा नजीकच्या कॉन्व्हेंटमध्ये पाल्याला प्रवेश देण्याकडे पालकांचा कल राहतो. मात्र लोणार नगर परिषद शाळेत याउलट चित्र आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते भूषण मापारी यांनी शाळेच्या कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी, शिक्षक यांची बैठक घेऊन डिजिटल शाळेची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेच्या माध्यमातून लोणार नगर परिषद उर्दू व मराठी प्राथमिक शाळा ह्या डिजिटल झाल्या आहेत.