लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द या गावातून टाकळी विरोकडे जाणाऱ्या शेतातील पाऊलवाटेचा रस्ता हा शेतकऱ्यांनी अडविल्याने गावातील ७० विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केले असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विरोधात दाद मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी दप्तर घेऊन तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी तहसीलदार गणेश पवार यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील लासुरा खुर्द या गावातील ७० विद्यार्थी टाकळी विरो येथील विद्यालयात शिक्षण घेतात. लासुरा येथून टाकळी विरो हे तीन कि.मी.चे अंतर असून, येथील विद्यार्थी शेकडो वर्षांपूर्वी असलेल्या शेतातील पाऊलवाटेने शाळेत पोहोचतात; मात्र मागील काही दिवसांपासून येथील शेतकरी श्रीराम वासुदेव जवंजाळ यांनी सदर रस्ता अडवून ठेवल्याने या भागातील सर्व शेतकऱ्यांनी पाऊलवाट बंद केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना टाकळी विरो येथील शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी शाळेत जाणे बंद केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पर्यायी रस्ता हा नदीला लागून असल्याने व या भागात दाट झाडेझुडुपे असल्याने हिंस्त्र जनावरांचा या भागात वावर असतो. यामुळे विद्यार्थी या रस्त्यावरुन जाण्यासाठी धजावत नाहीत. अनेक वेळा मागणी करुनही जवंजाळ यांनी हा रस्ता मोकळा करुन न दिल्याने मंगळवारी टाकळी विरो येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दप्तर घेऊन शेगाव येथील तहसील कार्यालय गाठले. यावेळी तहसीलदार पवार यांनी लगेच याबाबत मंडळ अधिकाऱ्यांना सदर रस्ता पाहणीसाठी पाठवित असल्याचे आश्वासन दिले. यावेळी कीर्ती जवंजाळ, निकिता मुंढे, कांचन घोपे, गायत्री जवंजाळ, मोनिका जवंजाळ, अंजली बावस्कार, मोनिका गावंडे, लक्ष्मी गावंडे, अंजली सुशीर, वैष्णवी मारोडे, निकीता खंडारे,पूजा इंगळे, गजानन जवंजाळ, शिवहरी जवंजाळ, सचिन जवंजाळ आदी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:20 AM