बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने विद्यार्थ्यांना निकालाची हुरहुर नाही किंवा त्यांच्या यशाचे कौतुकही होणार नाही. दहावी, बारावीचे हे विद्यार्थी शाळेत होणाऱ्या निरोप समारंभाच्या गोड अनुभवालाही मुकले आहेत. कोरोनामुळे अपेक्षाभंग झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात निरोप समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शाळेतील निरोप समारंभाच्या आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात. त्यानंतर, दहावी किंवा बारावीच्या परीक्षा, निकाल, यश, अपयक्ष हे अनुभवी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावी, बारावीच्या मुलांच्या प्रत्येक सुवर्ण क्षणावर पाणी फेरले आहे. वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइनवरचा शाळेचा अनुभव घ्यावा लागला. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा होणार नसल्याने, काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्ती केली आहे.
निरोप समारंभ खूप काही शिकवतो...
विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा खूप काही शिकवूण जात असतो. शिक्षक, मित्र, शाळा यांची ताटातूट, आनंदाचा क्षण, विद्यार्थ्यांचा उत्साह, आपण मोठे झाल्याची जाणीवही या समारंभातून होत असते. या कार्यक्रमाच्या आठवणी मुले जपून ठेवतात.
काय म्हणतात विद्यार्थी...
कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला यंदा शाळेत जाता आले नाही. शाळेत कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाही. वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला, परंतु परीक्षा झाली नाही. अनेक क्षणापासून आम्ही मुकलो.
शिवरंजन मुळे.
आमचाही शाळेचा निरोप समारंभ थाटात होईल, सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करू, अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनामुळे सर्व काही थांबले आहे.
खुशी शर्मा.
परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता काय असते, याचा अनुभव आम्हाला घेता आला नाही. यश मिळविल्यानंतर इतरांकडून होणारे कौतुकही यंदा होणार नाही. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा झाली नाही. अनेक अनुभवापासून आम्ही दुरापास्त झालो.
मुस्कान परविन.
आमच्या शाळेत निरोप समारंभ मोठ्या थाटात होत असतो, परंतु कोरोनामुळे निरोप समारंभच नाही, तर शाळेतील विविध कार्यकामांचा अनुभवही आम्हाला घेता आला नाही.
उदय इंगळे.
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी
दहावी ४५,०६८
बारावी ३२,१०८