मेहकर (जि. बुलडाणा): स्थानिक रहाटे शिक्षण व बहु.संस्था संचालित राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ५ मार्च रोजी पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याची शपथ घेऊन परिसरातील कचरा होळीमध्ये जाळून होळी साजरी केली. यावर्षीची होळी साजरी करताना होळीमध्ये घराजवळील परिसरातील केरकचरा जाळू; तसेच पर्यावरणाचा योग्य समतोल राखून होळीसाठी एरंडाचे झाड न तोडता नवीन झाड लावून होळी साजरी करु. रंग खेळताना रासायनिक रंग न खेळता नैसर्गिक रंगाने धूलीवंदन खेळू . कृत्रिम रंगाला कुठेच थारा देणार नाही, पाण्याचा अपव्यय न करता पर्यावरणपुरक होळी साजरी करू, अशी राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांंनी शपथ घेतली. त्यानुसार गुरुवारी परिसरातील कचरा वेचून विद्यार्थ्यांनी होळीत जाळला. तर एरंडाचे झाड न तोडता विद्यार्थ्यांंनी वृक्ष लावण्याचा संकल्प केला. सध्या रानावणात पळसाची फुले बहरलेली आहेत. या पळसाच्या फुलांचा रंग तयार करून याचा वापर रंगपंचमीत करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांंनी केला. हा रंग त्वचेचे व उष्णतेचे विकार कमी करतो. उन्हाळा सुरु होण्यापूर्वी पळसाच्या फुलांच्या रंगाने रंग खेळणे हे आरोग्यवर्धक आहे. म्हणून निसर्गाने उपलब्ध करुन दिलेल्या या पळस फुलांचा रंगपंचमीत वापर करुन व रासायनिक रंगाचा वापर टाळून पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प केला.
पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांची शपथ
By admin | Published: March 06, 2015 1:48 AM