लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ऐन परीक्षेच्या एका तासाआधी हॉल तिकीटअभावी परीक्षेस अपात्र ठरविलेल्या अंबादास सुधाकर जाधव या विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष वाया जाणार, या नैराश्येतून प्राचार्यांच्या दालनातच विषारी द्रव्य प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) २० जुलै रोजी घडली.तालुक्यातील बेराळा येथील अंबादास जाधव हा विद्यार्थी येथील आयटीआय.कॉलेजमध्ये ‘कोपा’ (कॉम्प्युटर आॅपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट) या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, विद्यार्थी अंबादास जाधव याला हॉल तिकीट न आल्याने त्याला परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी अपात्र घोषित केल्या गेले. त्यामुळे त्याने प्राचार्यांच्या दालनातच विषारी द्रव्य प्राशनाचा प्रयत्न केला. यावेळी प्राचार्यांच्या दालनात उपस्थित इतरांनी प्रसंगावधान राखून त्याच्या हातून विषाची बाटली हिसकून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. टेक्निकल कारणांमुळे या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट आले नाही व इतर विद्यार्थ्यांचेही हॉल तिकीट रात्री ११ वाजता मिळाले. ते आज सकाळी सर्वांना देण्यात आले.या विद्यार्थ्याची अडचण ही डीजीईटी (दिल्ली) वरून असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. याबाबत वेळोवेळी अमरावतीला मेलद्वारे पाठपुरावा सुरूच आहे; परंतु तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही हतबल असल्याची कबुली या प्रकारापश्चात प्राचार्यांनी दिली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच कॉलेजमध्ये दाखल झालेले पीएसआय मदन यांनी विद्यार्थ्याची समजूत काढून प्राचार्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यास बजावले. यावेळी पत्रकार संजय सुराणा, प्रताप मोरे, छोटू कांबळे, प्रशांत डोंगरिदवे, गणेश धुंदळे, नितीन फुलझाडे, प्रशांत ढोरे पाटील, अमोल व्यवहारे, अशोक काकडे, लक्ष्मण गवई, शंकर चव्हान, मो.हानीफ, रजाक, रवींद्र पवार, विशाल इंगळे, स्वप्निल वायाळ, शिवा भगत, विष्णू रिंढे, नंदीप वाघमारे, प्रमोद जाधव, आकाश देशमुख आदी नागरिक उपस्थित होते.
प्राचार्यांच्या दालनातच विद्यार्थ्याचा विष प्राशनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:01 AM