- अनिल गवई
खामगाव : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल व अभिक्षमता चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची पहीली पसंती ललित कलेकडे तर दुसरी पसंती गणवेशधारी सेवेला असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कृषी क्षेत्रालाच अधिक महत्व असल्याचे या अहवालात स्पष्ट होते.
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि श्यामची आई फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात आली. गत चार वर्षांपासून ही चाचणी घेण्यात येत असून यामध्ये कृषी, कला/मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा अशा ७ क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच यावर्षीपासून अभिक्षमता चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये भाषिक क्षमता, तार्किक क्षमता, अवकाशीय क्षमता आणि सांख्यिकीय क्षमतांचा समावेश आहे. कलानुसार आवश्यक असणाºया क्षमतासमृध्दीसाठी या चाचणीची मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल कृषी क्षेत्राकडे (१९.०८) टक्के असून, कृषी क्षेत्राची सर्वात कमी टक्केवारी मुंबई जिल्ह्याची (९.६१) असल्याचे दिसते.
पहिल्यादांच मोबाईल अॅपचा वापर!
राज्यातील राज्य शिक्षण मंडळातंर्गत इयत्ता दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा समावेश कल व अभिक्षमता चाचणीसाठी करण्यात येतो. यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच या चाचणीसाठी मोबाईल अॅपचा उपयोग करण्यात आला. याचाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य ललित कलेला (१८.२७) टक्के तर दुसरी पसंती गणवेशधारी सेवेला ( १७.७५) टक्के इतकी आहे.
अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ललित कलेत रस!
या अहवालातील उपलब्ध आकडेवारीवरून अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल ललित कला क्षेत्राकडे दिसून येतो. अकोला जिल्ह्यातील (१७.०९) टक्के विद्यार्थ्यांचा कल ललित कलेकडे असल्याचे स्पष्ट होते.
कल अहवालानुसार मार्गदर्शनाची व्यवस्था!
कल व अभिक्षमता चाचणीचे अहवाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. त्यांना त्यांच्या कलानुसार व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी व्यवस्था शासन स्तरावरून केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर, तसेच तालुका आणि जिल्हा स्तरावर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य व कल चाचणीचे जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कक्षांची स्थापना करण्यात आली. अविरत प्रशिक्षित शिक्षक, तालुकास्तरीय अविरत तज्ज्ञ व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समुपदेशक मार्गदर्शन करतील. या सुविधेचा इयत्ता दहावीच्या कल व अभिक्षमता चाचणी दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.