गिरीश राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पात्र शाळांमधील वर्ग पहिली ते आठवीपर्यंंंतच्या विद्यार्थ्यांंंना मोफत पाठय़पुस्तके वाटप करण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होण्यास एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना अद्यापही इयत्ता सातवीची पाठय़पुस्तके जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील शाळांना मिळाली नाहीत. शासनमान्यता असलेल्या शाळांपैकी जिल्हा परिषद, नगर परिषद, आश्रम शाळा व शासन अनुदानित शाळांना गेल्या काही वर्षांंंपासून वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंना मोफत पाठय़पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. याच योजनेंतर्गत यावर्षीही मोफत पाठय़पुस्तके प्रत्येक तालुक्यात प्राप्त झाली असून, सर्वशिक्षा अभियानाच्यावतीने या पाठय़पुस्तकांचे शाळांना वितरण करण्यात आले आहे. शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी या पाठय़पुस्तकांचे विद्यार्थ्यांंंना वाटप करण्यात येणार आहे. मात्र, वर्ग १ ते ८ पैकी वर्ग सातवी मराठी माध्यमाची मराठी, विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांची पाठय़पुस्तके सद्यस्थितीत जिल्ह्यास कमी प्रमाणात प्राप्त झाल्याने या विषयांच्या पाठय़पुस्तकांचे जिल्ह्यातील खामगाव, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर या तालुक्यांना अद्याप वितरण करण्यात आलेले नाही. तसेच वर्ग सातवा उर्दू माध्यमाची उर्दू बालभारती, गणित, इंग्रजी, इतिहास नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान या पाठय़पुस्तकांचे अनेक शाळांना वितरण करण्यात आलेले नाही. लवकरच वाटप न झालेली पाठय़पुस्तके जिल्ह्यास प्राप्त होऊन या पाठय़पुस्तकांचे वितरण शाळा उघडण्याअगोदर होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.तसेच यावर्षीपासून इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. मात्र, अभ्यासक्रमात बदल झालेली बीजगणित, भूमिती, इंग्रजी व इतर पाठय़पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. परिणामी दरवर्षी शाळा उघडण्याअगोदर सुरु होणारे शिकवणी वर्गसुध्दा यावर्षी भरले नाहीत. अनेक विद्यार्थी शाळा उघडण्याअगोदर उन्हाळ्याच्या सुटीतच पुस्तकांचा परिचय करुन घेत असतात. मात्र, यावर्षी शाळा उघडण्याच्या वेळेस पुस्तक पाहायला मिळणार आहे. तर जुनी पुस्तके घेणार्या विद्यार्थ्यांंंनाही यावर्षी इयत्ता नववीची पाठय़पुस्तके नवीनच घ्यावी लागणार आहेत.
सातवीच्या पाठय़पुस्तकांची विद्यार्थ्यांंना प्रतीक्षा!
By admin | Published: June 22, 2017 4:24 AM