डोणगाव : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध दाखले लागतात. त्यांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालय किंवा तलाठी, ग्रामसेवक यांच्या मागे फिरण्याच वेळ येऊ नये, यासाठी डोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतच मेहकर तहसील कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले वाटप करण्यात येणार आहे. १२ जून रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना तहसील व सेतू कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे तहसीलमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होते. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी ही शेतकºयांची मुले आहेत त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी आपल्या पाल्यासह त्यांना तहसीलमध्ये सेतू आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे यांनी डोणगाव परिसरातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना डोणगाव येथेच लागणारी प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक सेतू कार्यालयाच्या मदतीने डोणगाव येथेच १२ जून रोजी स्थानिक जिल्हा परिषद मुलांची शाळा आठवडी बाजार येथे शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी संबंधित तहसील कार्यालयातील चमू, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमेशियल, नॉन क्रिमीलेअर असे विविध प्रमाणपत्र दिले जाणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची विविध प्रमाणपत्रासाठी होणाºया धावपळीतून मुक्तता होणार आहे. याशिवाय प्रमाणपत्र एकाच दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डोणगाव सेतू संचालक अमोल ठाकरे यांनी केले आहे.
८५ टक्के च्या वरील विद्यार्थ्यांना मोफत प्रमाणपत्रे डोणगाव परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना ८५ टक्क्याच्या वर १० वी व १२ वी मध्ये गुण घेतले आहेत, त्या सर्वांना डोणगाव सेतू संचालक अमोल ठाकरे यांच्यामार्फत प्रवेशासाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे महिनाभर मोफत काढून दिल्या जाणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी प्रमाणपत्रासाठीची धावपळ व सामाजिक बांधिलकी या माध्यमातून आपण हा मोफत प्रमाणपत्र काढून वाटप करण्याचा उपक्रम राबवित असल्याचे लोकमतला सांगितले.