लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हगणदरी मुक्ततेसाठी खामगाव शहराला आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. खामगाव नगर पालिकेने हगणदरी मुक्त शहरासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर शुक्रवारी जिल्हा स्तरीय समितीमार्फत शहराची पाहणी करण्यात आली. यावेळी समितीने काही बाबींबर असमाधान व्यक्त केल्याचे समजते.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत खामगाव नगर पालिकेने शहर हगणदरीमुक्तीचा ठराव घेतला. या ठरावानुसार हगणदरी मुक्त शहर म्हणून पात्र ठरण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शहराची पाहणी केली. या पाहणीत समितीने अनेक बाबींवर समाधान तर, काही बाबींवर असमाधान व्यक्त केले. त्याचवेळी खामगाव नगर पालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत उल्पावधीत केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे कौतुकही जिल्हा स्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले. या समितीमध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर, खामगावचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार सुनील पाटील यांचा सहभाग होता. यावेळी खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्यासह आरोग्य पर्यवेक्षिका पल्लवी इंगळे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, सुनील राजपूत, नागेश रोठे यांच्यासह खामगाव पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकातील सदस्यांची उपस्थिती आहे.या भागात झाली पाहणी!शहरातील उघड्यावर हगणदरी असलेल्या काही भागांची पाहणी केली. यामध्ये बाळापूर फैल, शंकर नगर, चांदमारी, माखरिया मैदान, हरिफैल आदी भागाचा समावेश होता. चिखली रोडवर देखील पथकाने भेट दिली.
हगणदरी मुक्तीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसोबतच उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांचाही स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची वस्तुस्थिती असून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या अभियानाकडे कानाडोळा केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि हगणदरी मुक्त करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत खामगाव पालिकेची प्रगती दिसून येत आहे. मात्र, अद्यापही काही बाबींवर पालिकेला लक्ष देण्याची गरज आहे. -उदय कुरवलकर, जिल्हा प्रशासन अधिकारी, बुलडाणा.