चिखली : तालुक्यातील उंद्री, अमडापूर, किन्हीसवडद, तोरणवाडा, माळशेंबा, कव्हळा आणि या भागातील इतर परिसरात १६ व १८ जूनला झालेल्या पावाने शेकडो हेक्टर शेतजमिनी बाधित झाली आहे. पावसामुळे शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार श्वेता महाले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करून, तालुक्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.
आमदार श्वेता महाले यांनी १८ जून रोजी उंद्री, वैरागड, किन्ही सवडद, हरणी, डासाळा, अमडापूर व परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पं.स.सभापती सिंधू तायडे, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, जितेंद्र कलंत्री, संजय महाले, अमोल साठे, शिवणारायण नखोत, सरपंच गजानन बनकर, गजानन रसाळ, शिवाजी साठे, गजानन गुंड, दीपक तायडे, डिगंबर राऊत, पंढरी शेळके, गणेश चंदनपाट, सोपान महाले आदींसह तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी मंडळ अधिकारी महादेव शेळके यांची उपस्थिती होती.
मदतीसाठी पाठपुरावा करणार!
तालुक्यात कोसळलेल्या धुवाधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तीन तासांत तब्बल १०४ मिली पाऊस पडल्याने नदी व नाल्या दुथडी भरून वाहिल्या. यामध्ये नदी व नाल्याकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. उन्हाळी पेरणी वाहून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याने, त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने, तातडीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी आ.महालेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला.
पाझर तलाव फुटून झाले नुकसान!
अमडापूर येथील गट क्र.३४ व ३५६ मधील कृषी विभागाचा पाझर तलाव होता. त्या तलावाला सपाट करण्याचा प्रयत्न झाल्याने तो फुटला असून, यामुळे मधुकर मोतीराम सोनुने यांची जमीन खरडून गेली. या नुकसानीची पाहणीही आ.महालेंनी केली.