चिखली : कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार होण्यासह प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 'आरटीपीसीआर' चाचणी अहवाल २४ तासांच्या आत देण्यात यावे, तसेच चिखली येथे चाचणीसाठी रॅपिड किट इतर साहित्याची उपलब्धता करून देण्यात यावी, अशी मागणी चिखली भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपाच्या वतीने ५ मे रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन सदर मागणी करण्यात आली. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना 'आरटीपीसीआर' स्वॅब तपासणी अहवाल मिळण्यास चार-चार दिवस लागत आहेत. काही रिपोर्ट मिळतच नाही. परिणामी पॉझिटिव्ह व्यक्तीकडून संसर्ग वाढत आहे. तथापि, उशिरा अहवाल मिळत असल्याने बाधित रुग्णावर वेळेवर उपचारदेखील होत नाहीत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी अहवाल २४ तासांच्या देण्यात यावा, सोबतच अहवाल रु ग्णांपर्यंत मॅसेजद्वारे पोहोचविण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी करावी तसेच चिखली येथे अनेक दिवसांपासून रॅपिड किट उपलब्ध नसल्याने तातडीने चाचणी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तथापि, चाचणीची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंतच असल्याने याठिकाणी खूप गर्दी होत आहे. त्यामुळेही संसर्गाचा धोका वाढल्याने स्वॅब देण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांत करण्यात यावी व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, सागर पुरोहित उपस्थित होते.