डोणगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ८ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३० एप्रिल २०२१पर्यंत जी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत आपल्या हद्दीमध्ये शासकीय नियमाने १०० टक्के कोरोना लसीकरण करून घेईल, अशा संस्थेला सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे १ मे २०२१ रोजी विकासात्मक कामाकरिता एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती सुबोध सावजी यांनी राज्यपालांना दिली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाविषयी जवळपास अर्धा तास चर्चा करण्यात आली. सुबोध सावजी यांच्या या निर्णयाचे राज्यपालांनी स्वागत केले. लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सावजी यांनी दिली. यावेळी डाॅ. वरूण सावजी, डाॅ. प्रियंका सावजी (मुंबई) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लेखक युधिष्ठीर जोशी व नागेश कांगणे लिखीत ‘झुंज आमदारांची’ हेे पुस्तक भेट दिले.