अमडापूर : धरणात गेलेल्या जमिनीचा माेबदला देण्याच्या मागणीसाठी वैरागड येथील १० शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.
वैरागड येथील १० शेतकरी शासकीय जमीन ई- क्लासमध्ये सन १९८९ पासून शेती करीत आहेत. या शेतीसाठी शेतकऱ्यांनी दंडही भरला आहे; मात्र या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आला नाही. ही जमीन वैरागड येथील प्रस्तावित धरणात गेली आहे. या शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने माेबादला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी २५ जानेवारी राेजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली हाेती. मागणी मान्य न झाल्याने १० शेतकऱ्यांनी वैरागड ग्रामपंचायतसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. यामध्ये कोंडु लहाने, एकनाथ जगताप, ज्ञानदेव चवरे, तुकाराम चवरे, श्रीराम इथापे, अशोक पवार, प्रकाश निकाळजे, जिजाबाई गवई, यमुनाबाई बोर्डे, मोहन वानखडे यांचा समावेश आहे. मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.