शेलोडी येथील घाडगे नावाने असलेले ६३ के.व्ही.चे रोहित्र ओव्हरलोड असल्याने व विजेच्या समस्या उद्भवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनंतर १०० के.व्ही.चे करण्यात आले होते; परंतु ते रोहित्र लावताच जळाल्याने विजेअभावी जनावरांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती. ऐन हंगामात रोहित्र जळालेले निघाल्याने हरभरा, गहू इतर पिकांना सुद्धा मोठा फटका बसला. शेतकरी अडचणीत सापडले होते. दुसरीकडे पोल उभे, स्ट्रक्चर उभे, मात्र, मंजूर असलेले १६ के.व्ही. रोहित्रांची जोडणी करण्यात आली नसल्याने अनेकांना इंजन, ट्रॅक्टर पंपद्वारे गहू, हरभरा पिकांना पाणी द्यावे लागले. अशी परिस्थिती असतानाही शासन आदेशान्वये महावितरणने वीज बिल भरण्याचा तगादा लावला आहे. तीन महिने उलटूनही समस्या न सुटल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी रोहित्र बदलण्यात यावे, नवीन अतिरिक्त १०० के.व्ही. रोहित्र मंजूर करून बसवण्यात यावे, मंजूर असलेले १६ के.व्ही. रोहित्र बसविण्यात यावे, यासह पोल उभे करून अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी शेलोडी येथील शेतकऱ्यांनी ५ एप्रिलपासून शेतातील जळालेल्या विद्युत रोहित्रासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. या आंदोलनाची दखल घेत महावितरणकडून घाडगे रोहित्र तात्काळ बदलण्यात आले असून वीज पुरवठा सुरू झाला आहे. नवीन अतिरिक्त रोहित्राचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यात आले आहे. तर इतर मागण्यांसदर्भाने लेखी आश्वासन देण्यात आल्याने शेतात सुरू असलेले उपोषण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. यावेळी सरनाईक व महावितरणचे अधिकारी बोरकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले. लेखी आश्वासनानंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्ते अरुण पन्हाळकर, ज्ञानेश्वर घुबे, रामकृष्ण चव्हाण, विश्वनाथ घाडगे, श्रीधर घुबे, विठ्ठल मोरे, कैलास घाडगे आदी शेतकऱ्यांनी दिला.
शेलोडी येथील शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:35 AM