बुलडाणा : मागील सन २00९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात ४२ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब अजमाविले होते. या निवडणुकीत सुद्धा अपक्षांचा बोलबाला कायम आहे. यावेळी ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी तब्बल ४६ हजार ९१३ मते घेतली हो ती. यावेळी सर्वाधिक अपक्षांची संख्या जळगाव जामोद मतदारसंघात १0 एवढी आहे. तर सर्वात कमी अपक्ष उमेदवार खामगाव आणि चिखली मतदारसंघात प्रत्येकी ३ आहेत.लोकसभा मतदारांघाची भौगोलिक व्याप्ती आणि मतदारांची संख्या लक्षात घेता लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तग धरत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे पीक अधिक येते. मागील सन २00९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत १२७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ८५ उमेदवार विविध पक्षांच्या चिन्हावर, तर ४२ उमेदवार अपक्ष होते. या निवडणुकीत झालेल्या ११ लाख १0 हजार १४ मतदानापैकी ४६ हजार ९१३ मते अपक्षाच्या पदरात पडली होती. यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढली तशी उमेदवारांचीही संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीत उमेदवारांची संख्या १२७ होती यावेळी ती १५४ वर गेली आहे.
अपक्षांचा बोलबाला कायम
By admin | Published: October 02, 2014 11:48 PM