लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोताळा तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील आयएसओ मानांकन प्राप्त जि. प. मराठी प्राथमिक शाळेत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाच्या जोरावर इंग्रजी शाळेत जाणारा लोंढा थांबविण्यात यश आले आहे. सध्या शाळेची पटसंख्या ६१ वरून ८० वर पोहचली आहे.टाकळी वाघजाळ येथील जि. प. प्राथमिक शाळेत आनंददायी शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येतो. करपल्लवी, नाट्यीकरण, कविता करणे, संख्या वाचन, कल्पना विस्तार बुद्धीबळ, कॅरम, बॅडमिंटन यासारखे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. सर्व वर्गांमध्ये ई-लर्नींग संच, संगणक संच, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरओ, पंखे, वाचन कोपरा व शालेय विद्यार्थी वास्तू भांडाराची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेतील भिंतींवर इंग्रजी महिने, गणीतीय सूत्र, वारांची माहिती, स्वच्छतेचे संदेश रेखाटण्यात आले आहेत. यामुळे भिंती अगदी बोलक्या झाल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता चांगली राहावी, यासाठी शालेय पोषण आहाराअंतर्गत पौष्टीक आहार देण्यात येतो. यासोबतच शाळेत समाजातील विविध मान्यवरांचे वाढदिवस साजरे करून शाळेला आर्थिक व भौतिक सुविधांची मदत मिळविण्यासाठी पुढाकार घेण्यात येतो. शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देण्यात आला आहे. सध्या शाळेचा संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे.
साडेचार हजार शिक्षक, शाळा समिती सदस्यांच्या भेटीशाळेला २०१७ मध्ये आयएसओ मानांकन प्राप्त झाले. यासाठी शाळेतील शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. शैक्षणिक उपक्रमांसोबतच अद्ययावत भौतिक सुविधादेखील येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शाळेला राज्यभरातील ४ हजार ५०० शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी भेटी दिल्या आहेत. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे इतर शाळांनी अनुकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शालेय गुणवत्ता उत्तम दर्जाची आहे. शाळेत आनंददायी शिक्षण देण्यात येते. यामुळेच विद्यार्थी संख्ये वाढ झाली आहे. इंग्रजी शाळेकडे जाण्याचा ओघ थांबविण्यात आला आहे.-अशोक राजनकर, मुख्याध्यापक
नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळा जिल्हाभरात नावारूपास आली आहे. ही आम्हा गावकऱ्यांसाठी सार्थ अभिमानाची बाब आहे.-अरविंद मारोडकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.