देऊळगाव मही : देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बुद्रूक येथील एका महिलेचे देवदर्शनासाठी मंदिरात गेले असता गळ्यातील ५० हजार रुपयांचे हरवलेले मंगळसूत्र गावातीलच डॉ. नारायण लाड यांनी परत केले आहे. त्यामुळे आजही समाजात प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे निदर्शनास येत आहे.
एरवी हरवलेली एखादी किमती वस्तू किंवा पैसे सहसा कोणाला परत मिळत नाही. मात्र अपवादात्मक स्थितीत अशा किमती वस्तू संबंधितांना परत मिळतात. असाच प्रकार देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बुद्रूक येथे घडला. येथील लताबाई नाराण पऱ्हाड या ९ मार्च रोजी सायंकाळी गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र या दरम्यान त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानकपणे गळून पडले. त्याचा शोध त्यांनी घेतला पण ते सापडले नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी डॉ. नारायण लाड हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना हे मंगळसूत्र सापडले. दरम्यान, चौकशी केली असता त्यांना हे मंगळसूत्र लता नारायण पऱ्हाड यांचे असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी खातरजमा करून ते त्यांना परत केले. आपल्या कृतीमधून डॉ. लाड यांनी आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शविले आहे.