मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे महिलावर्गांनी किराणा दुकानात साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. मकरसंक्रांत हा महिलांचा महत्त्वाचा सण आहे. या सणानिमित्त तीळ-गुळाचे लाडू, वड्या केल्या जातात. त्यामुळे तीळ, गूळ आणि साखरेला मागणी वाढते.
सध्या केवळ साखरेच्या भावात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालेली असली तरी येत्या काळात तिळ आणि गुळाच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. तिळाचेही दरप्रसंगी दहा ते २० रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या प्रारंभी नागरिकांच्या किरणा बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
कोरोना संसर्गामुळे कुटुंबाचे अर्थकारण बिघडलेले आहे. त्यातच मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भावात चढउतार होत आहे. त्याचा फटका महिन्याच्या किराणा बजेटवर होत आहे.
अंजू मुळे, गृहिणी
कोट
भाव म्हणावे तसे स्थिर नाही. त्यात चढ-उतार होत असतात. मात्र गहू आणि तिळाच्या दरात गतवर्षीपेक्षा घट झाली आहे. येत्या काळात ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- इमरान खान, किराणा व्यावसायिक
तीळ भाव
गतवर्षी तिळाचे भाव हे १७० ते १८० रुपये किलोच्या आसपास होते. यंदा ते १४० ते १६० रुपयांच्या आसपास आले आहेत. कोणत्या कारणामुळे भावात घट झाली हे स्पष्ट नसले तरी येत्या काही दिवासात हे भाव वाढण्याची शक्यता आहे.
गूळ भाव
गुळाच्या दर्जानुसार त्याचे दर ठरतात. चांगल्या प्रतिचा गूळ सध्या ३५ ते ६० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत गुळाचे भाव कमी झालेले आहेत.
साखरेचे भाव
साखरेच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी ३५ रुपये किलो असलेली साखर यंदा ३८ रुपयांच्या आसपास गेली आहे. त्यात प्रसंगी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.