मेहकर (जि. बुलडाणा), दि. ५ : माहेरवरून दोन लाख रुपये आणण्यासाठी पती व सासरकडील मंडळींनी एका विवाहितेचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे सततच्या छळाला कंटाळून बदनापूर येथील विवाहि त महिलेने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.मदन आश्रूजी शेळके रा.मेहकर यांची मुलगी संध्या ऊर्फ संगीता हीचे पाच वर्षांपूर्वी बदनापूर, ता.मेहकर येथील रवींद्र तुळशिराम गाडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच पती, सासू, सासरा, दीर हे हुंडा आणण्यासाठी संगीताला त्रास देत होते. त्यानंतर संगीताला एक मुलगी झाली होती. तरीही माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी संगीताला त्रास सुरुच होता. काही वर्षे उलटल्यानंतर संगीताला दुसरी मुलगी झाली. तुला दोन्ही मुलीच झाल्या असून, आमच्या वंशाला दीपक पाहिजेत, असे म्हणून संगीताचा मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून संगीताला त्रास सुरुच होता. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी संगीता ही आ पली एक वर्षाची मुलगी श्रावणी हिला घेऊन घरुन निघून गेली होती, तशी तक्रार संगीताच्या माहेरकडील नातेवाइकांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन दिवसांपासून संगीता व तिच्या मुलीचा कसून शोध सुरु हो ता; मात्र संगीताचा कोठेही पत्ता लागत नव्हता. अखेर ५ सप्टेंबर रोजी बदनापूर शिवारातील एका विहिरीमध्ये संगीता व तिची मुलगी श्रावणी यांचा मृतदेह आढळून आला. श्रावणी ही संगीताच्या कमरेला एका कपड्याने बांधलेली आढळली. यासंदर्भात संगीताचे वडील मदन आश्रूजी शेळके रा.मेहकर यांनी मेहकर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन मेहकर पोलिसांनी आरोपी संगीताचा पती रवींद्र तुळशिराम गाडे, सासू यशोदा तुळशिराम गाडे, सासरा तुळशिराम सखाराम गाडे, दीर जसराम तुळशिराम गाडे रा.बदनापूर या चौघांविरुद्ध भादंवि कलम ३0४ ब, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी पती रवींद्र तुळशिराम गाडे व सासरा तुळशिराम सखाराम गाडे यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.
विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By admin | Published: September 06, 2016 2:13 AM