नांदुरा: शहरातील सावकाराच्या त्रासापायी येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना ६ जुलै रोजी नांदुरा येथे घडली होती. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी सावकार पवन शिवा मुंधडा व त्याच्या आई विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेलेत.नांदुरा येथील पंचवटी परिसरात राहणारी सविता हरिश्चंद्र भारसाकळे (वय ३८ वर्षे) ही महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होती. तिने शहरातील पवन शिवा मुंधडा व त्याच्या आईकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्याची परतफेड म्हणून त्या सावकाराला १५ हजार रुपये बचतगटाचे कर्ज काढून दिले होते. तरीही पवन मुंदडा व त्याची आई सविता हिला वारंवार पैशासाठी त्रास देत होते. त्यामुळे तिने ६ जुलै रोजी आत्महत्या केली. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये सदर बाब नमूद केली होती. सावकाराच्या जाचापायी आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने पोलिसांकडून पवन शिवा मुंधडा व त्याची आईविरुद्ध कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे.
महिलेची आत्महत्या; सावकाराविरुद्ध गुन्हा
By admin | Published: July 08, 2017 1:06 AM