लाेकमत न्यूज नेटवर्कधाड: पत्नीला वारंवार येणारा फोन कॉल व गावात होत असलेल्या बदनामीला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी वरूड (रंगप्पा) येथे उघडकीस आली. प्रकरणी धाड पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरुड (रंगप्पा) (ता. बुलडाणा) येथे जितेंद्र प्रभाकर सपकाळ ( वय २७ वर्षे) हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्रच्या पत्नीला गावातीलच जनार्धन शालिग्राम अपार ( वय ३० वर्षं) हा मोबाईल वरून कॉल करायचा. ही बाब जितेंद्रच्या लक्षात आली होती. नव्हे तर त्याच्या कुटुंबियांच्या तसेच गावकऱ्यांमधेही याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे गावात आपली बदनामी होत असल्याने जितेंद्र सपकाळ याने १८ नोव्हेंबर रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ओमप्रकाश सावळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या प्रकरणी मृतकाचा भाऊ गजानन प्रभाकर सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जनार्धन अपार याच्या विरोधात भादंवीचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश आपसुंदे, पोलीस शिपाई भास्कर लवंगे हे करीत आहेत. दरम्यान, जितेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आरोपी जनार्धन अपार हा फरार झाला आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहे.
बदनामीला कंटाळून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 3:51 PM